दहा वर्षे वयाच्या अनुप्रियाने मिळवली तिहेरी डॉक्टरेट पदवी …

कोल्हापूर : देशभरात सर्वत्र 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानानिमित्त भारतात सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करतात. भारतीय संविधानाचे महत्त्व काय आहे, ते का बनवले गेले, कोणाची महत्त्वाची भूमिका आहे, हे आजकाल सर्वांना समजणे गरजेचं बनले आहे. पण कोल्हापुरातील एक लहान मुलगी बाकी सर्वांपेक्षा वेगळी आहे. तिला नुसते भारतीय संविधान माहितीच नाहीये, तर संविधानाची प्रस्तावना आणि त्यातील कलमे अगदी तोंडपाठ आहेत. कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोड परिसरातील गंधर्व नगरी येथे राहणारी अनुप्रिया अमितकुमार गावडे ही फक्त 10 वर्षांची मुलगी आहे.

ती सध्या शांतिनिकेतन विद्यालय येथे पाचवीत शिक्षण घेत आहे. पण इतक्या कमी वयात देखील जगातील सर्वात कमी वयातील तिहेरी डॉक्टरेट मिळवणारी, ग्रँडमास्टर, भारतभूषण पुरस्काराने सन्मानित होण्याचा मान तिला मिळाला आहे. त्यामुळे प्रा. डॉ. अनुप्रिया अमितकुमार गावडे या नावाने देखील तिला ओळखले जाते.वयाच्या चौथ्या वर्षी अनुप्रियाच्या शिक्षकांनी तिची आकलन क्षमता ओळखली होती. कोल्हापुरातील सीए म्हणून काम करणाऱ्या अमितकुमार गावडे आणि नाईट कॉलेज कोल्हापूर येथील प्रा. डॉ. अक्षता गावडे यांनी देखील आपली मुलगी अनुप्रिया शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत प्रतिभाशाली आहे हे ओळखले आणि तिला त्या दृष्टीने प्रोत्साहन दिले. वयाच्या आठव्या वर्षी अनुप्रियाने असा पराक्रम केला होता जो प्रचंड अनुभव असलेले निष्णात वकील देखील करू शकत नाहीत. तिने भारतीय राज्यघटनेच्या 35 कलमांचे केवळ 6 मिनिटे 10 सेकंदात वाचन केल्याबद्दल तिला ग्रँडमास्टरची पदवी देण्यात आली होती. इतकेच नाही तर अनुप्रियाने अवघ्या 4 मिनिटे 11 सेकंदात मुलांच्या हक्कांवरील संपूर्ण संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनाचे वाचन केले होते. ‘प्राध्यापक’ ही पदवी तिला महात्मा गांधी ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी, फ्लोरिडा, यूएसए यांनी बहाल केली आहे.भारतीय संविधानातील विविध भागातील विविध कलमे ती व्यवस्थितरीत्या बोलते. त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील अनुप्रिया समजावून सांगते. शाळेत मला बऱ्याच वेळा शिक्षक किंवा माझे मित्र मैत्रिणी याबाबत विचारतात. त्यावेळी मी मोठ्या आनंदाने ही कलमे त्यांना समजावून सांगते, असे अनुप्रियाने सांगितले आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध रेकॉर्ड बुकमध्ये अनुप्रियाचा उल्लेख आहे.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, फ्यूचर कलाम्स बुक ऑफ रेकॉर्ड, यूके वर्ल्ड रेकॉर्ड बुक आणि इतर अनेक विक्रमांमध्ये तिचा उल्लेख करण्यात आला आहे. तिला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ट्रस्ट, मुंबई तर्फे बालरत्न पुरस्कार, ध्रुव रत्न पुरस्कार, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा इंडिया आयकॉन पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. अनुप्रियाला आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 21 राष्ट्रीय पुरस्कार, तीन राज्य आणि 9 क्षेत्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड आणि शैक्षणिक स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके मिळविली आहेत.

उल्लेखनीय प्रतिभेमुळे प्रा. डॉ. अनुप्रिया अमितकुमार गावडे जागतिक स्तरावर मोठा सकारात्मक प्रभाव पाडेल याची खात्री आहे. त्यामुळेच तिच्या या यशाबद्दल तिच्या पालकांसोबत अख्ख्या कोल्हापूरला तिचा अभिमान आहे.