कोल्हापूर:छत्रपती शिवाजी नगर, मनेर मळा उंचगाव येथील मुख्य रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

छत्रपती शिवाजी नगर–मनेर मळा परिसरातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र डांबरीकरणास काही कालावधी लागणार असल्यास, तोपर्यंत रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात *मुरूम व खडी टाकून रस्ता व्यवस्थित करण्यात यावा*, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या रस्त्याचा वापर *आबालवृद्ध, महिला, शाळकरी मुलं-मुली, ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण, गरोदर महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, रोजंदारी कामगार तसेच व्यावसायिक व नोकरदार वर्ग* मोठ्या प्रमाणात करतो. रस्त्याची खराब अवस्था असल्यामुळे या सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि दैनंदिन प्रवासाचा विचार करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत उंचगाव चे उपसरपंच शिंदे साहेब, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच श्रीधर कदम, सामाजिक कार्यकर्ते शामराव यादव, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब यादव आणि सामाजिक कार्यकर्ते अजित माने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर केले.
सार्वजनिक बांधकाम विभागातील *प्रमुख श्री. इंगवले साहेब* यांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेत, रस्ता डांबरीकरण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मुरूम व खडीकरण करून रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन दिले आहे.
या आश्वासनामुळे परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून, आता प्रत्यक्षात लवकरात लवकर काम सुरू होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
*“नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि कायमस्वरूपी डांबरीकरणाचा प्रश्नही मार्गी लावावा,” अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.*
