नॅनोरॉडपासून पोकळ नॅनोट्यूब बनविण्याच्या प्रक्रियेला पेटंट

डी. वाय. अभिमत विद्यापीठच्या संशोधनाला मान्यता.

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी भारतातील नामांकित रामानुजन फेलोशिप अंतर्गत भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या पेटंटला मान्यता मिळाली आहे.

‘झिंक क्रोमियम लेयर्ड डबल हायड्रोक्साईड नॅनोट्यूबसह थिन फिल्म्स’ तयार करण्याच्या पध्दतीला हे पेटंट जाहीर झाले असून विद्यापीठाला मिळालेले हे ९ वे पेटंट आहे.

डॉ. जे. एल. गुंजकर (रामानुजन फेलो) व प्रा. सी. डी. लोखंडे (रिसर्च डिरेक्टर) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित आणि प्रमाणित केलेल्या या पद्धतीसाठी १० सप्टेंबर २०२० मध्ये संशोधकांनी पेटंटसाठी अर्ज केला होता. विविध चाचण्यांमधून आणि २ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांती हे पेटंट मंजूर झाले.

या संशोधांतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्ण पद्धत पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटेंट स्वरूपात संरक्षित केली जाईल.या संदर्भात संस्थेचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी माहिती देताना सांगितले, “डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गत मिळालेले हे नववे पेटंट आहे. विद्यापीठ प्रशासन आणि संशोधकांच्या दृष्टीने आनंददायी बाब असून त्यामुळे संशोधन कार्याला अधिक गती मिळाली आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात रामानुजन फेलोशिपवर संशोधनाचे कार्य करत असणारे मुख्य संशोधक डॉ. जे. एल. गुंजकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, “सदर संशोधनाद्वारे अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने बनविण्यात आलेले ‘झिंक क्रोमियम लेयर्ड डबल हायड्रोक्साईड’ या पदार्थाचे काचेवर डीपोसिशन घेण्यात आले आहे. यासाठी सगळ्यात प्रथम झिंक ऑक्साईडचे नॅनोरॉड्सतयार करून ते क्रोमियमच्या द्रव्यात काही कालावधीसाठी बुडवून ठेवल्यानंतर त्याचे रूपांतर ‘झिंक क्रोमियम लेयर्ड डबल हायड्रोक्साईड’मध्ये झाले. या पदतीद्वारे तयार केलेला पदार्थ हा गॅस सेन्सर, सुपरकॅपॅसिटर अथवा बॅटरीमध्ये अतिशय उपयुक्त ठरू शकतो. यापूर्वीही डॉ. जे. एल. गुंजकर यांनी नाविन्यपूर्ण पद्धती शोधून अनेक पेटंट त्यांच्या संशोधनाच्या कार्यकाळात संपादन केले आहेत.या संशोधनामध्ये मुख्य संशोधक डॉ. जे. एल. गुंजकर यांच्यासमवेत रिसर्च डिरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, संशोधक विद्यार्थी रोहिणी शिंदे, नवनाथ पडळकर, श्रीकांत सदावर आणि आकाश पाटील तसेच कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचा सहभाग होता. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी अभिनंदन केले.