कोल्हापूरात कर्नाटक मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

कोल्हापूर : सीमावाद प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्मई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती नाला असा काढण्यात येत होती. दरम्यान, हे आंदोलन काही अंतरावर जाताच पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले की, जत, अक्कलकोट व सोलापूरवर बोम्मई दावा करत कर्नाटकचा भाग असल्याचे सांगत आहेत. मात्र, चोराच्या उलट्या बोंबा असतात तशाच बोम्मई यांच्या उलटड्या बोंबा आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा सुरु असताना त्याला छेद देण्याचे काम बोम्मई करत आहेत.