दसऱ्याच्या मुहूर्तांवर ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींची उलाढाल !

कोल्हापूर (प्रतीनिधी) : दसऱ्याच्या मुहूर्तांवर अर्थचक्राला गती मिळाली असून ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींची उलाढाल झाली. दोन वर्षांनंतर यंदा बाजारात प्रचंड उत्साह होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा बाजार ठप्प झाला होता. यंदा मात्र, अर्थचक्राला गती मिळाल्याचे दिसून आले.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या सणाला दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या विक्रीने सीमोल्लंघन केले आहे. यापूर्वीच्या विक्रीच्या तुलनेत यंदा दुचाकी विक्रीने चार कोटींचा, तर चारचाकीच्या विक्रीत दोनशे कोटी रुपयांचा उच्चांक गाठल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदा दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची सरासरी पन्नास टक्के इतकी विक्रमी विक्री झाल्याने अर्थचक्राला मोठी गती मिळाली. एकाच दिवशी १८५० दुचाकींची विक्रीशहरातील वेगवेगळ्या विक्रेत्यांकडे सुमारे १८५० पेट्रोलवरील दुचाकींची विक्री झाली.

यामध्ये युनिक ऑटोमोबाइलमध्ये ४५०, पॉप्युलर ऑटो येथे ३५०, माय ह्युंदाईमध्ये १०५० दुचाकींची विक्री झाली. १२२० चारचाकींची विक्रीदसऱ्याच्या मुहूर्तावर शहरातील विक्रेत्यांकडे सुमारे १२२० चारचाकी वाहनांचीही विक्री झाली आहे. यामध्ये महिंद्राच्या चारचाकी कार आणि मालवाहतूक अशा २००, युनिक ऑटोमोबाइलमध्ये ३६०, माय ह्युंदाईमध्ये १७५, साई सर्व्हिसमध्ये २५०, चेतन मोटर्समध्ये १३५, भारत निसानमध्ये ४०, सोनक टोयोटामध्ये ६० चारचाकी गाड्यांची विक्री झाली आहे. अनेक ग्राहकांनी महिनाभर आधीपासूनच मोटारसायकलचे बुकिंग करून ठेवलेले होते. त्यांच्याशिवाय विक्रेत्यांनी दसऱ्याला ऐनवेळी येणाऱ्या ग्राहकांनाही नाराज न करता मोटारसायकल देण्यात आली.