डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 57 विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यात नोकरी


कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल विभागाच्या 57 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. डीएक्ससी, वरली, सुदर्शन केमिकल्स, लक्ष्मी ऑरगॅनिक्स, स्मृती ऑरगॅनिक्स, अक्वाटेक लि., कॉग्निझंट, बिर्ला सॉफ्ट, डीआरडीओ आदी नामांकित कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना सुविधांसोबत भरघोस पगाराच्या नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत.

केमिकल विभागाने आपली प्लेसमेंटची यशस्वी घोडदौड यंदाही कायम ठेवली आहे. जागतिक स्तरावरील कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही केमिकल इंजिनीरिंगची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उत्तम प्लेसमेंटमुले केमिकल शाखेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

केमिकल इंजिनिअरिंग ही समाजाच्या मूलभूत घटकांच्या पूर्तता करणारी अभियांत्रिकिमधील युनिव्हर्सल अशी शाखा आहे. लस, औषधे निर्मिती, प्लास्टिक, टेक्सटाइल, खते, सिमेंट, पेंटस, बि- बियाणे, तणनाशके, सुगंधी द्रव्ये निर्मिती, फूड टेक्नॉलॉजी इत्यादी मूलभूत गरजा पूर्ण करणारी शाखा असलेने केमिकल अभियंत्यांची मागणी उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे.

केमिकल विभागाच्या १५ विद्यार्थ्यांना अमेरिका, जर्मनी, इंग्लंड इत्यादी प्रगत देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी संधी मिळाली आहे. केमिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक वृंद यांच्या मार्गदर्शनाचा तसेच महाविद्यालयातील फॉरेन लँग्वेज क्लब व हायर एज्युकेशन क्लबचा देखील या विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे.

गेल्या ३८ वर्षांपसून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची देदीप्यमान परंपरा जपणाऱ्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याना व्यक्तिमत्व विकास व प्लेसमेंटच्या दृष्टीने सातत्याने प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या प्रशिक्षणाचा चांगला फायदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांना झाला. केमिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. के. टी. जाधव, डॉ. अमर जाधव, सर्व शिक्षक, प्लेसमेंट इन्चार्ज डॉ. राहुल महाजन, ट्रेनिंग इन्चार्ज प्रियांका पाटील, कॅम्पस ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग हेड मकरंद काईंगडे यांचे या विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यानी यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.