श्री मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीत व्हावे यासाठी प्रयत्न करू : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि राज्य शासनाने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर श्री मूर्तीच्या उंचीची मर्यादा हटविल्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तींचे विसर्जन हे पंचगंगा नदीमध्येच व्हावे यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निश्‍चितपणे परवानगी आणू आणि गणेशोत्सव मंगलमय वातावरणात साजरा करु, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.


मागील दोन वर्षाप्रमाणे प्रशासनाने यंदाही गणेशोत्सवात श्री मूर्ती विसर्जन हे पंचगंगा नदीऐवजी शहापूर खणीमध्येच करण्याचे नियोजन केले आहे. मात्र या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध दर्शविला जात आहे. श्री मूर्ती विसर्जन संदर्भात सोमवारी शहरातील विविध सार्वजनिक मंडळांनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.


त्यावर आमदार आवाडे यांनी, इचलकरंजी शहर व परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने गणेश उत्सव साजरा केला जातो. मागील दोन वर्षे संपूर्ण देशभरात निर्माण झालेल्या कोरोना महामारीमुळे सर्व सणांसह गणेशोत्सवावरही निर्बंध घालण्यात आले होते. श्रींची मूर्ती किती उंचीची असावी यासाठी बंधन घालण्यात आले होते. त्याला सर्वांनीच सहकार्य देत गणेशाच्या लहान मूर्ती केल्याने त्याचे विसर्जन शहरातील विविध भागात प्रशासनाच्यावतीने बनविण्यात आलेल्या कृत्रिम जलकुंडात तसेच शहापूर खणीत करण्यात आले. मात्र यंदा राज्य शासनाने सण-उत्सव बंधनमुक्त केली असून यंदाचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय शेवटचे पाच दिवस रात्री १० ऐवजी रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पिकर सुरू ठेवण्यासस परवानगी दिल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. इचलकरंजी शहरात विसर्जन मिरवणूकीचा मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा अर्थात शिवतीर्थ-कॉ. मलाबादे चौक-म.गांधी पुतळा-झेंडा चौक ते नदीवेस नाका असा आहे. यंदा मोठ्या संख्येने भव्यदिव्य अशा श्री मूर्तींची प्रतिष्ठापना होणार असल्याने विसर्जनासाठी पंचगंगा नदी हाच पर्याय सोयीचा ठरणार आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाचा ओसंडून वाहत असलेला उत्साह आणि सोयीचे ठिकाण याचा विचार करुन इचलकरंजीत यंदा पंचगंगा नदीमध्येच श्री मूर्ती विसर्जनासाठी परवानगी देण्यासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन श्री मूर्ती विसर्जन हे पंचगंगा नदीत होण्यासाठी निश्‍चितपणे परवानगी आणू असा विश्‍वास व्यक्त केला.
यावेळी बाळासाहेब कलागते, पै. अमृत भोसले, शैलेश गोरे, मलकारी लवटे, महावीर कोल्हापूरे, राजेंद्र जोंग, राजेंद्र दरीबे, सागर कम्मे, किशोर पाटील, सचिन माळी, संदीप बेलेकर, सुभाष मोरबाळे, दत्ता सुर्यवंशी, अविनाश कांबळे, सुधाकर कोष्टी, रविंद्र लोहार आदींसह विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.