इचलकरंजी (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक सस्मरण करण्यासाठी दि. १३ ते दि. १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने महापालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी शहरातील स्वयंसेवी संस्था सामाजिक संस्था यांच्या प्रतिनिधी प्रतिनिधी सोबत बैठकीचे आयोजन केले होते.
हा उपक्रम संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येणार असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदर उपक्रमामध्ये स्वयंसेवी / सामाजिक संस्थांना सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
यास अनुसरून प्रशासक तथा प्रभारी अधिकारी यांनी हर घर तिरंगा या उपक्रमा साठी आवश्यक ध्वज खरेदीकरीता आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन उपस्थित संस्थांचे प्रतिनिधींना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देवुन शहरातील इचलकरंजी टेक्स्टाईल सी. इ. टी. पी. या संस्थेकडून रक्कम रुपये १.०१.०००/- चा धनादेश प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी इचलकरंजी टेक्स्टाईल सी.ई.टी.पी. संस्थेचे संदीप मोघे, संदीप सागावकर, अजित डाके, संभाजी लोकरे, मारुती पन्हाळकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
