कागल (प्रतिनिधी) : शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारने तात्काळ मराठा समाजातील युवकांना बळ देण्याच्या उद्देशाने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ३० कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यातून खऱ्या अर्थाने मराठा युवकांना बळ देण्याचे कार्य केले आहे, असे मत समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

पत्रकात पुढे म्हंटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय आहे, याबद्दल शिंदे व फडणवीस सरकारचे मनस्वी अभिनंदन.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच रखडलेले अनेक प्रश्न निकालात काढून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यास मदत होते. मात्र तोकड्या निधीमुळे मराठा समाजाच्या अनेक मागण्या रखडल्या होत्या. त्यामुळे आण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा संघटना आणि मराठा समाजाकडून करण्यात येत होती. या मागणीचा तात्काळ विचार करत राज्य सरकारने तीस कोटींचा निधी दिला आहे.
राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या माध्यमातून मराठा समाजातील अनेक युवकांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य आणि रोजगाराच्या अनेक संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. त्यांच्या समस्यांबाबत आम्ही मागील सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र गेंड्याच्या कातडीच्या महाआघाडी सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. पण आता सत्तेत असलेल्या सरकारने तातडीने दिलेल्या निधीमुळे मराठा समाजाला फार मोठा दिलासा लाभणार आहे. जनतेच्या हक्काचे असणारे हे सरकार समाजातील कोणत्याही घटकाला विकासापासून वंचित राहू देणार नाही. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला तात्काळ निधी देणे होय.
