निवडणूक लादल्याचे खोटे कशाला बोलता? शाहू आघाडीच्या प्रश्नांची उत्तरे द्या : आमदार आसगावकरांचे आव्हान

शेंडूर : कोजिमाशि पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या नावाखाली केवळ दोन जागांवर आमची बोळवण करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला.  सत्तेची हाव असणाऱ्या आणि स्वत:ला स्वाभिमानी समजणाऱ्या नेत्यांनी आता आम्ही निवडणूक लादली म्हणून टीका करण्यात अर्थ नाही. विरोधी आघाडीला कमी समजता, मग आमच्या राजर्षी शाहू आघाडीच्या प्रश्नांची खरी उत्तरे द्यायला सज्ज व्हा. असे थेट आव्हान शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी कोजिमाशिच्या सत्ताधारी नेतृत्वाला दिले. तुमची खोटे बोल, पण रेटून बोल ही वृत्ती सर्वांना माहिती आहे. माझ्यावर वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा आमच्यासह सर्व सभासदांसमोर खरे बोलून तुम्ही सामोरे जाणार का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

      कागल तालुक्यातील शेंडूर येथे ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठीच्या ‘ राजर्षि शाहू लोकशाही विकास आघाडी’ च्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

 सत्तारूढ आघाडीतील विद्यमान संचालक व माजी सभापती प्रा. एच. आर. पाटील यांनी राजर्षी शाहू आघाडीला पाठींबा देत स्वाभिमानीचे नेतृत्व हे सत्ता व संपत्तीसाठी पोराची शपथ देत नातवंडानाही  बाजूला सारणारे नेतृत्व आहे, अशी बोचरी टीका केली.

यावेळी आमदार आसगावकर आणि प्रा. एच. आर. पाटील यांच्यासह माजी सभापती संभाजीराव खोचरे, प्रा. समीर घोरपडे, व्ही. जी. पोवार, एस. टी. चौगले, उमेदवार बाळासाहेब पाटील, बाबा पाटील, बी. एस. खामकर आदींनी विरोधी राजर्षी शाहू विकास आघाडीची बाजू खरी का आहे याचे सविस्तर विवेचन केले.

याप्रसंगी आमदार आसगावकर यांच्या हस्ते  प्रा. एच. आर. पाटील,  प्रा. समीर घोरपडे, भुदरगड तालुका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वजीर मकानदार यांचा सत्कार करण्यात आला.

  मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, विलास साठे, मिलिंद पांगिरेकर, शिक्षक नेते बी. डी. पाटील, उदय पाटील, के. के. पाटील, संजय डी. पाटील, सुदेश जाधव, एस. एम.पाटील, वसंतराव पाटील, मुख्याध्यापिका प्रभावती पाटील आदी उपस्थित होते.  स्वागत व प्रास्ताविक व्ही. जी. पोवार यांनी केले तर आभार मुख्याध्यापक पी.व्ही. पाटील यांनी मानले.

पर्दाफाश करणारच … !

सेवानिवृत्तीनंतरही ६६ व्या वर्षी कोजिमाशी पतसंस्थेच्या कारभारात गेली सात वर्षे दादा लाड हे सत्ता व संपत्तीच्या लोभासाठी एकाधिकारशाही करीत आहेत. माझ्यासह यापूर्वीही अनेकांचा विश्वासघात केला आहे. त्यांच्या या भ्रष्ट कारभाराचा सभासदांसमोर पंचनामा करून त्यांच्या मनमानी व अपप्रवृत्तीचा पर्दाफाश करणारच असल्याचा इशारा विद्यमान संचालक प्रा. एच.आर. पाटील यांनी  दिला. विश्वासघाताची किंमत त्यांना या निवडणूकीत निश्चितपणे मोजावी लागेल, असेही ते म्हणाले.