संजय राऊत यांच्यामुळेच ४० आमदारांचे बंड

पाटण : आम्ही शिवसेना सोडली नसून आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिले असून पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या ४० आमदारांनी संजय राऊतांमुळेच बंड केले असा आरोप आमदार शंभूराजे देसाई यांनी केला.

शंभूराजे देसाई पुढे म्हणाले, शरद पवार जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल असे सांगितले होते, पण अडीच वर्षात हे सरकार कोसळले. आता शरद पवार म्हणत आहेत मध्यावधी निवडणुका लागणार, पण तसे होणार नाही. आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे नेण्याचे काम करणार असून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जाण्याचे ठरवले आहे. ज्या युतीच्या जीवावर मते मागितली. ती तोडून अनैसर्गिक युती कशी करायची हे आम्ही पक्षनेतृत्वाला सांगितले होते. तसेच आमची पहिल्यापासून आमच्या पक्ष नेतृत्वाकडे युतीसोबत जाण्याची मागणी होती. शिवसैनिकांची मागची अडीच वर्षे शिवसेनेत गळचेपी झाल्याने हा उठाव केल्याचे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.