विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षक आमदारांना त्यांच्या जवळील फुटीर संचालकाकडून मिळतील : संजय परीट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विरोधी आघाडीने दादा लाड यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमदारांना हवी असतील तर त्यांनी स्वतःकडे घेतलेल्या फूटीर  संचालकाकडून उत्तरे जाणून घ्यावीत कारण हे दोन- तीन संचालक व्यासपीठावर आमदारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, असा टोला संजय परीट यांनी लगावला.

  कोजिमाशि पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या प्रचारासाठी गडहिंग्लज येथे सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडीच्या सभासद मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साधना शिक्षणसंस्थेचे सचिव जे. बी. बारदस्कर होते.

संजय परीट म्हणाले, चांगली चालवेलेली संस्था मोडकळीस आणण्यासाठी विरोधक आघाडीचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून सद्या या निवडणूकीत राजकीय शक्ती व काही संस्थाचालक उतरलेले आहेत. त्यांचे मनसुबे सभासद उधळून लावतील. विरोधकांना कामाची टेंडर दिली नाहीत, त्यांच्या नातलगांची नोकर भरती केली नाही आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या       जागा संस्थेने खरेदी केल्या नाहीत म्हणून याचा मनात राग धरून विरोधकांचा विरोध करण्याचा आटापिटा सुरू आहे. मात्र सत्ताधारी आघाडीचे प्रमुख दादासाहेब लाड यांच्या स्वाभिमानी सहकारी आघाडीवर जिल्हयातील सर्व सभासदांचा विश्वास असल्याने विरोधकांचा पराभव अटळ आहे.

   माजी नगराध्यक्षा प्रा. स्वातीताई कोरे म्हणाल्या, शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी कोजिमाशि पतसंस्थेच्या सभासदांसाठी, शिक्षकांच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठीच आजपर्यंत योग्य निर्णय घेतले आहेत. शिक्षकांचे नेतृत्व म्हटलं की दादासाहेब लाड यांचा चेहरा प्रथम समोर येतो. या संस्थेच्या उत्कर्षासाठी गडहिंग्लज तालुक्यातील सर्व सभासदांचे पाठबळ असून जिल्ह्यातील सर्व सभासदांनी आपल्या उत्कर्षासाठी सत्ताधारी आघाडीस पुन्हा निवडून द्यावे असे सभासदांना आवाहन केले.

    या प्रसंगी राधनगरीचे शिक्षकेत्तर नेते एम. एन. पाटील म्हणाले, कार्यकर्ता जपणे व त्याची काळजी घेणे हे दादासाहेब लाड यांच्याकडून शिकावे. म्हणून आम्ही राधानगरी तालुक्यातून आपल्या स्वाभिमानी सहकारी आघाडीच्या ८० टक्के सभासद पाठीशी आहोत. त्यामुळे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही केलेला आहे. हे निवडणूकीनंतर विरोधकांना समजेल.

   शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले, सभासदांच्या पाल्यांच्या उच्चशिक्षणासाठी अल्प दरात ५ लाख रुपयांच्या कर्जाचा निर्णय आम्ही घेऊ, तसेच बिनव्याजी कर्ज लॅपटॉक खरेदी, १५ हजार देशांतर्गत व २५ हजार रुपये देशाबाहेर विमानप्रवासाने पर्यटनासाठी देऊ व कर्जमर्यादा ४० लाख रुपये करू आदी संस्थेच्या माध्यमातून कर्ज देऊ असा वचननामा व्यक्त केला.

      दादासाहेब लाड पुढे म्हणाले, विरोधकांनी ही निवडणूक पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. तालुकावार मतदान घ्यावे म्हणजे राजकिय शक्ती व संस्था चालकांचा दबाव टाकून सभासदांना आपल्यासारखे मतदान करून घेणे असा रडीचा डाव खेळला मात्र जिल्हा पातळीवरच मतदान घेण्याचा निर्णय झाल्याने त्यांच्या पायातील वाळू सरकली आहे. या रडीचा डाव खेळणाऱ्या विरोधकांना पराभूत करण्यासाठी स्वाभिमानी सहकारी आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

     याप्रसंगी चेअरमन बाळ डेळेकर, माजी नगराध्यक्षा प्रा. स्वातीताई कोरे, विनोद नायकवडे, नागेश मुंगरवाडे, अजित नडदगले,  हेमंत  कोल्हेकर, आर. वाय. पाटील, अशोक हुबाळे, दत्तात्रय परीट, गंगाराम शिंदे, सुरेश मगदूम, विठ्ठल चौगले, उदय अमानगी, शरद पाटील, डी. व्ही. कांबळे, एस. आर. मुंडे, शिवाजी होडगे, विजय गुडवे, डी. व्ही. चव्हाण, श्रीकांत देऊसकर, रफिक पटेल, संजय देसाई, आदी मान्यवरासंह गडहिंग्लज तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येनी उपस्थित होते.