प्रस्तावित आय.टी.पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नांव देवून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात : आमदार राजेश क्षीरसागर यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

कोल्हापूर  : प्रदीर्घ कालावधीच्या मागणीनंतर कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल. आय.टी.पार्क कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असून, या आय.टी.पार्कच्या माध्यमातून छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याला, स्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या नगरीमध्ये स्थापिल्या जात असलेल्या आय.टी.पार्कचे “करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी आय.टी.पार्क” असे नामकरण करावे. यासह आय.टी.पार्क विकसित होत असताना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून उच्च दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा (State of the Art Infrastructure) उपलब्ध कराव्यात अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे आज केली.

 

 

 

 

कोल्हापूर जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कप्रमुख पदावर नियुक्तीनंतर उद्योग मंत्री ना.उदय सामंत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. संपर्कप्रमुख नियुक्तीबाबत मंत्री ना.उदय सामंत यांचा आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे स्वागत करीत जाहीर सत्कार केला.

यावेळी झालेल्या बैठकीत बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रथमत: कोल्हापूरला आय.टी.पार्क मंजूर केल्याबद्दल जाहीर आभार व्यक्त केले. कोल्हापुरात सुमारे ३४.३६ हेक्टर जागेत हे आय.टी.पार्क होत असताना कोल्हापूर हे सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसह सीमाभागाचा केंद्रबिंदू असल्याने या भागातील युवकांना त्याचा उपयोग व्हावा. यासाठी उत्कृष्ठ असे आय.टी.पार्क निर्माण करून त्याला मुंबई, बेंगलोर, पुणेच्या धर्तीवर आय.टी.हबचा दर्जा प्राप्त करून द्यावा. मोठमोठ्या कंपन्यांनी याठिकाणी गुंतवणूक करावी याकरिता मित्र संस्थेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करू.

प्रस्तावित आय.टी.पार्कची शेंडा पार्क येथील जमीन ही शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असल्याने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून आय.टी.पार्क विकसित करीत असताना उच्च दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा (State of the Art Infrastructure) विकसित करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘झिरो-डिग’ युटिलिटी ट्रॅचेस (Underground Plug & Play Channels), ग्लोबल IT CFC (Common Facilitation Center & AR/VR Labs), डार्क फायबर कॉरिडॉर व प्रायव्हेट 6G टेस्टबेड (Ultra-High-Speed Zero Latency Network), ग्लोबल IP आणि पेटंट डेस्क (Local to Global IP Registry), १००% ‘झिरो कार्बन’ ग्रीन बिल्डिंग्स, आयटी पार्कमध्येच समर्पित एक्सप्रेस फीडर आणि २२०/३३/११ केव्ही सबस्टेशनसह मजबूत वीजपुरवठा नेटवर्क, २००० घनमीटर जीएसआर आणि १००० घनमीटर ईएसआरसह समर्पित २४ तास पाणीपुरवठा, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र, भारतातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्समार्फत (केंद्र सरकारची सेवा) मजबूत इंटरनेट सेवा, कोल्हापूरच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला साजेसे सजावटीचे प्रवेशद्वार आदी सुविधा निर्माण करण्यात याव्यात जेणेकरून अधिकाधिक आयटी कंपन्या आकर्षित समृद्ध असे आयटी पार्क विकसित होण्यास मदत होईल. यासह छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याला, स्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या नगरीमध्ये स्थापिल्या जात असलेल्या आय.टी.पार्कचे “करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी आय.टी.पार्क” असे नामकरण करावे. यासह स्थानिक कंपन्याना विश्वासात घेवून त्यांना आय.टी. पार्कमध्ये प्राधान्य द्यावे, अशी प्रामुख्याने मागणी केली.

ते पुढे म्हणाले कि, कोल्हापूरला क्रीडानगरीची ओळख अधोरेखित करण्याकरिता निर्माण केल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी उद्योग विभागाने जागा उपलब्ध केल्याबद्दल आभार आणि अभिनंदन व्यक्त केले. या ठिकाणी उच्च दर्जाचे स्टेडियम बांधकाम करून क्रीडारसिकांना आवश्यक सोयी सुविधा त्याठिकाणी उपलब्ध कराव्यात. कोल्हापुरात पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसंह इतर औद्योगिक वसाहती उपलब्ध आहेत. याठिकाणी मोठ्या उद्योगांना आकर्षिक करण्याचे शासनाच्या वतीने प्रयत्न व्हावेत, जेणेकरून मोठ्या कंपन्याची याठिकाणी गुंतवणूक वाढून कोल्हापूरच्या रोजगाराला आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.

चौकट :

*शिवसेनेतील निष्ठावंताना विविध नियुक्त्या, पदांच्या माध्यमातून न्याय द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर*

कोल्हापुरात १९८६ पासूनच्या स्थापनेपासूनचे शिवसैनिक निस्वार्थी आणि एकनिष्ठपणे काम करत आहेत. उपमुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या उठावानंतर त्यांच्या भूमिकेला समर्थन करण्याची सर्वप्रथम भूमिका फक्त कोल्हापूर शहरातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी घेतली. आमच्या सर्वांच्या घरावर प्रसंगी मोर्चे आले, जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले. अशा या त्रासदायक वेळेतही न डगमगता खंबीरपणे ना.एकनाथ शिंदे साहेबांना साथ दिली. या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना विविध समित्या, महामंडळे, विविध पदांच्या माध्यमातून न्याय देणे आवश्यक असून, यामाध्यमातून निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्यावा, अशी मागणीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, शहरप्रमुख रणजित जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, समन्वयक कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, सुनील जाधव, आश्पाक आजरेकर, रिक्षासेना जिल्हाप्रमुख राजू पवार, अनिल पाटील, टिंकू देशपांडे, कृष्णा लोंढे, अंकुश निपाणीकर, सौरभ कुलकर्णी, देवेंद्र खराडे, सचिन भोळे, किरण अतिग्रे, अर्जुन संकपाळ, मुन्ना तोरस्कर, आदर्श जाधव आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

🤙 8080365706