कागलच्या बचत गटांचे काम जिल्ह्यातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल इतके आदर्श करूया- सौ नवोदिता घाटगे राजे बँक व जिजाऊ महिला समितीच्या बचत गटाच्या महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

कागल :कागलमधील महिला बचत गटांचे काम जिल्ह्यातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आदर्श करुया.असे आवाहन राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे यांनी केले.
कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल येथे राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेमार्फत आयोजित राजमाता जिजाऊ महिला बचत गटांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

 

 

सौ.घाटगे पुढे म्हणाल्या, बचत गट ही केवळ आर्थिक व्यवहाराची व्यवस्था नाही तर ती महिलांच्या आत्मविश्वासाची आणि स्वावलंबनाची प्रक्रिया आहे. या माध्यमातून एकत्रित प्रयत्नातून छोटा व्यवसाय मोठा होऊ शकतो आणि छोट्या स्वप्नांचे मोठ्या यशात रूपांतर होऊ शकते.

शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,महिलांनी केवळ अर्थार्जनावर न थांबता कुटुंबासह समाजात आर्थिक स्वराज्य उभे करावे.
राजे बँक आणि राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्यामार्फत महिलांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि योग्य मार्गदर्शन देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. या संधींचा पुरेपूर उपयोग करून महिलांनी कुटुंबासोबतच समाजही आर्थिकदृष्ट्या सक्षम करावा.
यावेळी कल्लाप्पाणा आवाडे बँकेच्या महिला बचत गट विभाग प्रमुख नजमा शेख यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.
तालुका व्यवस्थापक अरुण कांबळे यांनी बचत गटांची स्थापना, कामकाज, व्यवसायासाठी मिळणारे कर्ज तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील,नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सारिका बारड, राजे बँकेचे सर्व संचालक,कार्यकारी संचालक अरुण पाटील, तसेच नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.
राजे बँकेचे उपाध्यक्ष रविंद्र घोरपडे यांनी स्वागत केले.नगरसेवक अरुण गुरव यांनी आभार मानले.
फोटो ओळ :
कागल येथे आयोजित महिला बचत गट मेळाव्यात बोलताना राजे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदितादेवी घाटगे व राजे समरजितसिंह घाटगे.समोर मोठ्या संख्येने उपस्थित महिला.

‘मन की बात’मध्ये बचत गटांच्या आदर्श कार्याचा उल्लेख व्हावा.

कागल विधानसभा मतदारसंघात २०१७ पासून राजमाता जिजाऊ महिला समिती कार्यरत असून, महिलांनी समितीच्या विविध प्रशिक्षण व उपक्रमांचा लाभ घ्यावा.महिला व बचत गटांनी आपले काम इतके आदर्शवत करावे की, त्याची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन त्याचा उल्लेख ‘मन की बात’ या कार्यक्रमात करावा.असे प्रतिपादन घाटगे यांनी केले.

🤙 8080365706