मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता कंगाल झाली आहे तर दुसऱ्या बाजूला सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलने मात्र इंधन दरवाढीतून यंदा २४ हजार १८४ कोटींचा विक्रमी नफा मिळवत ही कंपनी मालामाल झाली आहे.
जानेवारी ते मार्च दरम्यान लिटरमागे ९ रुपयांचे नुकसान होत असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या इंडियन ऑइलने त्याच तिमाहीत ६०२१.८८ कोटींचा नफा कमावला आहे. ३१ मार्च २०२२ ला संपलेल्या आर्थिक वर्षात इंडियन ऑइलने हा नफा मिळवला आहे. तो २०२०-२१ च्या तुलनेत २ हजार ३०० कोटी जास्त आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरावरून इंधन दर ठरतात. एकेकाळी तेल कंपन्यांनी मागणी केल्यानंतर सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून देत होते. मात्र अलीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार इंधनाचे दर कमी-जास्त करण्याची मुभा सरकारी तेल कंपन्यांना सरकारने दिली आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर इंधन दरवाढ झाली. इंधनाचे दर गगनाला भिडल्याने वाहतूक खर्चात वाढ होऊन महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यात सामान्य नागरिक होरपळत आहेत. असे असताना तेल कंपन्यांनी मात्र विक्रमी नफा कमावला आहे.