नवी दिल्ली : एकिकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असतानाच, तर दुसरीकडे आता घरगुती गॅसच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ५० रुपयांनी वाढ झाली आहे आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलिंडर एक हजार रुपयांना मिळणार आहे.
कोल्हापुरात याआधी घरगुती गॅस सिलिंडरसाठी ९५३ रुपये मोजावे लागत होते. आता त्यात पुन्हा दरवाढ झाल्यामुळे सिलिंडर १००३ रुपयांना विकत घेण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.
गेल्या १० महिन्यात एलपीजी सिलेंडर १६५ रुपये ५० पैसे महागला आहे. जुलै २०२१ पासून तब्बल ५ वेळा गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. आता मुंबईत सिलिंडर ९९९.५० रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही ९९९.५० रुपयांना गॅस मिळणार आहे. तर कोल्हापुरात १००३ रुपयांना मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक कारणांसाठी या गॅसच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर किंमतीतही वाढ झाली आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ
१ मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. एक मेला व्यवसायिक सिलिंडरचे दर १०४ रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यावेळी घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा का होत नाही दिलासा मिळाला होता. मात्र आज गॅस घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आल्याने आता एका गॅस सिलिंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस दरवाढीसोबतच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात देखील सातत्याने वाढ सुरूच आहे.