कोरोनाच्या फटक्यातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी १२ वर्षे लागणार

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशाला मोठ्या संकटातून जावे लागत असून लॉकडाऊनमुळे देशाचे अर्थचक्र विस्कळीत झाले. भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून दोन वर्षांनंतर आर्थिक स्थिती पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या कोरोना काळात देशाचे किती नुकसान झाले आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी किती वर्षे लागणार याबाबत आरबीआयने एक नाव रिपोर्ट जारी केला आहे. आर्थिक स्थिती पूर्ववत होण्यासाठी जवळपास 10 ते 12 वर्षांचा काळ लागेल असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

कोरोना महामारीमुळे गेल्या तीन वर्षात भारताचे जवळपास 50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे झालेले हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी जवळपास 10 ते 12 वर्षांचा काळ लागेल असे आरबीआयने स्पष्ट केलेय. आरबीआयने रिपोर्टमध्ये पुढे म्हटले की, 2034 ते 2035 पर्यंत देशाचे कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढता येईल असा अंदाज आहे.

दरम्यान देशात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या पून्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश ,कर्नाटक अशा अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे.

आरबीआयच्या या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे गेल्या तीन वर्षात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. आता रुग्णसंख्या कमी असल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र तरी देखील अर्थव्यवस्था सुधारणा वाढीचा वेग कमी आहे. यामागे रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे कारण देखील सांगितले जात आहे. कारण या युद्धाचा परिणाम केवळ भारतालाच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला देखील सहन करावा लागतोय. महागाई प्रचंड प्रमाणात वाढतेय. भारताला देखील या महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वस्तूंच्या आयात निर्यातीवर युद्धाचा परिणाम दिसून येतोय.