इंधन दरवाढ सुरूच! पेट्रोल-डिझेल ८० पैसे; सीएनजी गॅसही महागला

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ काही केल्या थांबत नाही. आज पुन्हा प्रत्येकी ८० पैशांची दरवाढ झाली. तर सीएनजी व पीएनजीच्या दरातही जबर वाढ झाली आहे. सीएनजी ७ रुपयांनी तर पीएनजी गॅस ५ रुपये ८० पैशांनी महागले आहेत. १६ दिवसांत पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी १० रुपये लिटरने महागले आहे.

तेल कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या सुधारित इंधन दरानुसार पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ८० पैसे लिटरने महागले. यामुळे मुंबईत पेट्रोल १२० रुपये ५१ पैसे आणि डिझेल १०४ रुपये ७७ पैसे लिटर झाले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल १०५ रुपये ४१ पैसे आणि डिझेल ९६ रुपये ६७ पैसे लिटर झाले आहे. २२ मार्चपासून आतापर्यंत १४ दिवस इंधन दरवाढ झाली. त्यात २ आठवड्यांत पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी १० रुपयांनी महागले. या इंधन दरवाढीमुळे अनेक राज्यांमध्ये डिझेलने शंभरी ओलांडून आता ते ११० रुपये लिटरकडे वाटचाल करत आहे. तर पेट्रोल १२५ रुपयांकडे झेपावत आहे. एका बाजूला पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत असताना दुसऱ्या बाजूला महानगर गॅस लिमिटेड सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही अनुक्रमे ७ आणि ५ रुपये ८० पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे