नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा आलेख चढताच असून आज मंगळवारी पेट्रोलच्या दरात ८४ पैशांनी आणि डिझेलच्या दरात ८५ पैशांनी दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.
देशात १३७ दिवसांच्या विश्रांतीनंतर २२ मार्च २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर आतापर्यंत १४ पैकी १२ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीतून दिलासा मिळेल अशी अपेक्षा नाही. याचे कारण म्हणजे तेल कंपन्या १३७ दिवसांच्या कालावधीत झालेले नुकसान भरून काढण्यात गुंतल्या आहेत. त्या काळात कच्च्या तेलाच्या किमती खूप वाढल्या होत्या आणि देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकामुळे इंधनाच्या किमती वाढल्या नाहीत. त्यामुळे आता कंपन्या तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर ११९.६७ रुपये आणि १०३.९२ रुपये, तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे १०४.६१ रुपये प्रति लिटर आणि ९५.८७ रुपये प्रति लिटर गेल्या १५ दिवसांमध्ये पेट्रोल दरात झालेली वाढ ९.२० रुपये इतकी आहे.