कोल्हापूर : कोल्हापूर शहराची बहुचर्चित हद्दवाढ लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे सूतोवाच पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर शहरात जवळची चार- पाच गावे समाविष्ट केली जाणार असून कोल्हापूर महापालिकेचे १०० प्रभाग होणार असल्याचे सांगत प्रभागरचना नव्याने करावी लागणार असल्याचे सांगितले.
कोल्हापूर शहराची गेली अनेक वर्षे नैसर्गिक हद्दवाढ झालेली नाही. १९७२ ला महापालिकेची स्थापना झाली त्यावेळी शहराची जेवढी हद्द होती, तेवढीच आजही आहे. हद्दवाढ झाली नसल्याने केंद्र शासनाच्या विविध योजनासाठी कोल्हापूर पात्र ठरत नाही. परिणामी निधी मिळत नसल्याने शहर विकासापासून वंचित रहात आहे. कोल्हापूर महापालिका शहरातील लोकांना नागरी सुविधा पुरवण्यात अपयशी ठरली असल्याने ग्रामीण भागातील जनता महापालिकेत समाविष्ट व्हायचे नाही असा निर्धार करीत विरोधाचे हत्यार उपसत आहे. परिणामी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचे आतापर्यंत अनेक प्रस्ताव तयार झाले. पण ग्रामीण भागाच्या विरोधामुळे ते बासनात गुंडाळावे लागले. हद्दवाढ समर्थक आणि ग्रामीण विरोधक यांच्यातील वादामुळे ४२ गावांचा समावेश असलेल्या कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची घोषणा २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची चळवळ पुन्हा सक्रिय झाली होती.
दरम्यान या पार्श्वभूमीवर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे. सध्या असलेल्या ८१ प्रभागांचे १०० प्रभाग होतील. तुम्ही डावीकडे बघा, उजवीकडे बघा, मागेही बघा आणि पुढेही बघा. काय होईल हे सांगता येत नाही. वार्ड रचना परत नव्याने होणार असून १०० वार्ड होतील.