नंदवाळमध्ये रिंगण सोहळ्यावेळी पोलिसांचा लाठीमार

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील भारत राखीव बटालियनच्या मैदानावर होणाऱ्या रिंगण सोहळ्यासाठी बटालियनने परवानगी नाकारल्याने ग्रामस्थ व बटालियन यांच्यात वाद चिघळला असून पोलीस आणि वारकऱ्यांत आज जोरदार धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला.

नंदवाळ येथील विठ्ठल मंदिरात गेल्या आठवडाभरापासून हरिनाम सप्ताह सुरू आहे यानिमित्ताने सोमवारी रिंगण सोहळा व दिंडीचे आयोजन केले होते. यासाठी सुमारे सहा हजारांहून अधिक वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार होते. हा रिंगण सोहळा भारत बटालियनच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला व भारत बटालियन अधिकारी यांच्याकडे मागणी केली. परंतु भारत बटालियनच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रिंगण सोहळ्यास परवानगी नाकारली होती. तर या ठिकाणीच रिंगण सोहळा घेण्यासाठी वारकरी आग्रही होते. बटालियन मैदानावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर रिंगण सोहळा बटालियन मैदानावर सुरू ठेवण्याचा प्रयत्न वारकऱ्यांनी सुरू ठेवल्याने पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये जोरदार झटापट आणि धक्काबुक्कीचा प्रसंग घडला.