कोल्हापूर : बंटी पाटीलसाहेब धमकीची भाषा वापरू नका. यादव, शिंदे यांना मध्ये कशाला आणता, वार करायचा असेल तर माझ्यावर करा, मी समर्थ आहे, असे थेट आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
चंद्रकांतदादा पाटील आज सायंकाळी लाईन बाजार परिसरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, माजी महापौर सुनील कदम घरफाळा विषयाचा लढा लढत आहेत. तो त्यांचा लढा आहे. याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत असताना कोणाचं नाव घेतलं नाही. मात्र मी टोपी फेकली आणि ती बंटी पाटलांना बसली. त्यावर पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी अपुरी माहिती असल्याचे सांगितले. मात्र, मला येणारी माहिती अपुरी असू शकते. धमकीची भाषा वापरू नका. बंटी पाटील तुम्ही मराठा आहात असे म्हणता. एका भाषणात तुम्ही समोरुन वार करतो असे म्हणाला होता. पण यादव-दिवाणजीवर आरोप करण्यापेक्षा थेट माझ्यावर वार करा, मी समर्थ आहे.
चंद्रकांतदादा म्हणाले, मी मंत्री असताना माझ्याकडे आठ खाती आणि १३ आयएएस ऑफिसर होते. यादव हे माझे ओएसडी होते. सत्ता बदल झाल्यावर त्यांची उस्मानाबादला बदली केली गेली. भेटाभेटी करून त्यांनी सांगलीला बदली करून घेतली. गेल्या अडीच वर्षात त्यांचा आणि माझा काही संबंध नाही तरीही त्यांना त्रास दिला जातो. सुनील कदम यांनाही मी सांगितले आहे विधानसभेच्या निवडणुकीत घरफाळ्याचा विषय बाजूला ठेवा. विधानसभेचे निवडणूक विकासावर लढली गेली पाहिजे.