अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्यास निघालेल्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी रोखले

खेड : दापोली तालुक्यीतील मुरुड समुद्रकिनारी असलेलं अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याची घोषणा करत कार्यकर्त्यांसह दापोलीला निघालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कशेडी घाटात रोखले.

अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून मुलुंड येथील निवासस्थानावरुन निघताना प्रतिकात्मक हातोडा सोमय्या दापोलीकडे रवाना झाले होते. कशेडी घाटात सोमय्यांना पोलिसांनी अडवले आहे. तसेच नोटीस देण्यात आली. सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे दापोलीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र सोमय्यांना दापोलीत येण्याआधीच खेड पोलिसांनी कशेडी घाटात अडवून नोटीस दिली.

पोलिसांनी नोटीसीत म्हटले आहे की, आपण आपल्या मागणीबाबत सनदशीर मार्गाने न्याय मागावा. कोणत्याही खाजगी जागेमध्ये अनधिकृत प्रवेश करु नये. आपणाकडून आणि आपल्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनादरम्यान कोणतेही बेकायदेशीर कृत्य घडून दखलपात्र किंवा अदखलपात्र स्वरुपाचे कृत्य घडल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल.