खोचीतील बालिकेच्या खूनप्रकरणी उमेशचंद्र यादव विशेष सरकारी वकील

मुंबई : हातकणंगले तालुक्यातील खोची येथील सहा वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खूनप्रकरणी राज्य शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. विधी व न्याय विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली बोरुडे यांनी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

खोची येथील सहा वर्षीय बालिकेचे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भरदिवसा अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याचदिवशी तिचा मृतदेह आढळून आला होता. सदर बालिकेचे प्रथम अपहरण, बलात्कार करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते.   गुन्हेगारांला काही तासातच जेरबंद केले.या प्रकरणात बंडा उर्फ प्रदीप पोवार आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

मूळचे कोल्हापूरचे असणारे ॲड. यादव राज्य शासनाच्या वतीने महत्वाच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा सिटी लीमोझिंन घोटाळा,संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे कोपर्डी खून-बलात्कार प्रकरण, जवखेडे अहमदनगर येथील तिहेरी दलित हत्याकांड, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जामखेड दुहेरी हत्याकांड, सामाजिक कार्यकरत्या रेखा जरे खून प्रकरण,पोलीस अधिकाऱ्यानी कर्तव्यावर असताना मॉडेलवर केलेले साकिनाका बलात्कार प्रकरण,घाटकोपर येथील हिरे व्यापारी उदानी हत्याकांड, संगमनेर येथील व्यापारी गौतम हिरेन अपहरण-खून प्रकरण, रझा अकादमीच्या मोर्च्या वेळी घडलेली मुंबईतील आझाद मैदान दंगल प्रकरण या इतर महत्वाच्या प्रकरणांचा समावेश आहे.