तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

सांगली : वाळू तस्करांनी तहसीलदारांच्या शासकीय गाडीवर डम्पर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आटपाडी तालुक्यात घडली आहे. गाडीचालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूलचे कर्मचारी सुखरुप बचावले. 

 याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी-मुढेवाडी मार्गावर आटपाडीच्या तहसीलदार बाई माने या वाळू तस्करावर कारवाई करण्यासाठी जात होत्या. आबानगर चौकात त्यांच्या गाडीवर डम्पर घालून त्यांना आणि गाडीतील महसूलच्या अन्य कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. चालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूल पथकाचे कर्मचारी सुखरुप आहेत. मात्र, डम्परच्या धडकेनंतर शासकीय वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीचे दरवाजे डम्परमध्येच अडकल्याने तहसीलदार काही काळ मोटारीतच अडकल्या. या प्रकारानंतर डम्पर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.