शेतीचा वीज पुरवठा खंडीत करणार नाही : उर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई : शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने शेतीचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही, अशी घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

  राज्यात वीज खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांकडे 6423 कोटी रुपये थकीत आहेत. कृषीपंप असणाऱ्या ग्राहकांकडे डिसेंबरपर्यंत 44 हजार 920 कोटी रुपये थकबाकी झाली आहे. एकूण 64 हजार कोटी इतकी प्रचंड थकबाकी झाली आहे. थकबाकी भरण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या वीज तोडणीची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही. तसेच ज्यांचे विज बिले थकीत आहेत त्यांनी त्वरित दुरूस्ती करून घ्यावी. महावितरणतर्फे सुमारे 3 कोटी ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे 9011 कोटी रुपये, तर शासकीय कार्यालयांकडे 207 कोटी रुपये थकीत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

  दरम्यान, या निर्णयाचे भाजपाने स्वागत केले आहे. आपण घेतलेला निर्णय हा अधिवेशन संपल्यानंतरही कायम रहावा एवढीच इच्छा,” असा मिश्किल टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.