एकानेच सगळे चिडीचूप, उद्या दुसरा शक्तिशाली व्हिडिओ बॉम्ब टाकल्यावर काय होईल?


मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती अजूनही दहा टक्के पुरावेच लागले आहेत, ९० टक्के पुरावे अजून बाहेर यायचे आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

देवेंद्र फडणवीस हे सोमवारी विधानसभेत आणखी एक व्हीडिओ बॉम्ब टाकणार आहेत. एकाच व्हीडिओ बॉम्बने सगळेजण इतके चिडीचूप झाले आहेत. मग दुसरा बॉम्ब टाकल्यावर काय होईल? दुसरा व्हिडिओ बॉम्ब आणखी शक्तिशाली आहे, असा दावा चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.
ते रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडू महाराष्ट्रातील नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा दावा सपशेल फेटाळून लावला. स्वायत्त तपास यंत्रणांवर संशयाची सुई फिरवणे लोकशाहीला घातक आहे. केंद्रीय तपास यंत्रणा चुकीचे वागत असतील तर न्यायालय त्यांना ठोकेल. पण न्यायालय राज्य सरकारलाच ठोकत आहे. परमबीर सिंह, सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायालयाने प्रत्येकवेळी राज्य सरकारला फटकारले आहे. मग आता तुम्ही भाजपने न्यायालयं विकत घेतली, असाही आरोप करणार का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलेल्या व्हीडिओंचा पास हा सीबीआयकडे जाईल. आम्ही त्यासाठी न्यायालयात जाऊ. अनिल देशमुख प्रकरणाप्रमाणे न्यायालय या प्रकरणाचा तपासही सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.