इचलकरंजीतील स्मशानभूमीच्या पार्किंगसाठीप्रश्नी मंगळवारी उपोषण

इचलकरंजी : स्मशानभूमी पार्किंगप्रश्नी संदर्भात इचलकरंजी नागरिक मंचचे उमेश पाटील व शितल मगदूम नविन नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात मंगळवारी, दि. १५ मार्चपासून आमरण उपोषण करणार आहेत.

इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीघाटावर स्मशानभूमी पार्किंग प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य महामार्गावर असलेल्या स्मशानभूमीवर पार्किंग सुविधा नसल्याने सतत वाहतूकची कोंडी होत असते तसेच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत गेल्या सात वर्षांपासून पाठपुरावा करून घेऊन सदर काम अंतिम टप्प्यात आणले आहे. या ठिकाणी जाण्याकरिता २० फूट रस्ता व पट्टे मारणे एवढे काम केल्यास हे पार्किंग खुले होऊ शकते.

याबाबत इचलकरंजी नागरिक मंचच्यावतीने ११ फेब्रुवारीला इचलकरंजी नगरपालिका प्रशासकाना निवेदन दिले असून त्यांनी १२ फेब्रुवारीला प्रत्यक्ष पाहणी करून ते अधिक सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवून १ महिन्यात प्रक्रिया करून काम सुरू करत असल्याबाबत नगरअभियंता बागडे यांनी तोंडी सांगितले होते. याबाबत इचलकरंजी नागरिक मंचच्या सदस्यांनी फक्त २० फूट रस्ता करून पट्टे मारून लोकार्पण करा व इतर काम नंतर करा अशी विनंती केली.त्यानंतर ३ मार्च रोजी प्रत्यक्ष भेटल्यानंतर वस्तुस्थिती सांगितल्यानंतर प्रशासक टेंडरच्या कामावरच आग्रही असल्याने आम्ही १० तारखेपर्यत किरकोळ काम पूर्ण करण्याबाबत आपणास कळवले होते.

त्यानंतर कसलाही प्रतिसाद नसल्याने इचलकरंजी नागरिक मंचचे उमेश बापूसो पाटील व शितल भाऊसो मगदुम हे दोन कार्यकर्ते १५ मार्च रोजी इचलकरंजी नगरपरिषद प्रवेशद्वारात आमरण उपोषणास बसणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत इतर कार्यकर्तेही लाक्षणिक उपोषण करतील, असे इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.