मुंबई : विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२-२३ या वर्षाचा २४ हजार कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात कृषी संदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर भुविकास बँकांचे ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांकडे असणारे ९६४ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा केली.
अर्थसंकल्प सादर करण्याआधी अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकासाठी राज्य सरकारकडून २५० कोटींचा निधी जाहीर केला.
अर्थसंकल्प सादर करताना शेतीवर अधिक भर दिला आहे.तसेच भूविकास बँकांच्या जमिनींचा, इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे. नवीन आर्थिक वर्षात या अनुदानाचा लाभ अंदाजे २० लाख शेतकरी बांधवांना होनर असून त्याकरीता सन २०२२-२३ मध्ये दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
शेती विषयी केलेल्या तरतुदी : शेततळ्यांना आता ७५ हजारांचे अनुदान देणार, मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला १० कोटींचा निधी जाहीर, ६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार, गोसीखुर्द प्रकल्पासाठी ८५० कोटी रूपये उपलब्ध करून देणार, महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे. कोरोनामुळे पंचसूत्री अर्थसंकल्पावर भर देणार, बाळासाहेब पाटील कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार, हळद संशोधन १०० कोटीविदर्भ आणि मराठवाडा सोयाबीन केंद्र, ३ वर्षात १ हजार कोटी खर्च करणार. मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना राबवण्यात येणार आहे. कोकण कृषी आणि वसंतराव नाईक विद्यापीठांना ५० वर्ष पूर्ण होणार असल्याने ५० कोटींचा निधी जाहीर. तरकृषी निर्यात धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे त्यांनी जाहीर केले.