आता खरा सामना मुंबई महापालिकेतच : देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिवसेनेला खुलं आव्हान देत आता खरा सामना तर मुंबई महापालिकेत होणार असल्याचे सांगून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजवलं आहे.

गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विजयाने हुरळून न जाता अधिक मेहनतीने काम करायचं आहे. कारण आता खरी लढाई मुंबईत होणार आहे. मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी, असल्याचा टोला त्यांनी लगावला.