राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँकेच्या पाच नवीन शाखांना मंजुरी

कागल (प्रतिनिधी) : येथील स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आशिर्वादाने व राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शतक महोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नविन पाच शाखा उघडण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एम्. पी. पाटील यांनी दिली.

कागल तालुक्यातील मुरगूड, केनवडे, चिखली तर करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगांव व आजरा तालुक्यातील उत्तुर येथे नविन शाखा सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, आरबीआयचे संचालक सतीश मराठे आदींचे सहकार्य झाले. तर शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे असेही पाटील यांनी सांगितले.

  रिझर्व्ह बँकेचे नियम तंतोतंत पाळून रिझर्व्ह बँकेच्या एफ. एस. डब्ल्यू. एम. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापन हे निकष पूर्ण केले आहेत. बँकेच्या सद्या नऊ शाखा सक्षमपणे कार्यरत आहेत. आता या पाचसह एकुण चौदा शाखा होणार आहेत. विशेष म्हणजे कार्यरत असलेल्या शाखांच्या प्रमाणात पन्नास टक्केपेक्षा जादा नवीन शाखांना मंजुरी मिळविणारी राजे बँक एकमेव आहे. यामुळे बँकेच्या विविध योजना ग्राहकांना अधिक सुलभतेने मिळण्यासाठी होणार आहे.

बँकेकडे दि. ०८ मार्चअखेर ४२२ कोटी रुपयांच्या ठेवी असून २३९ कोटी रुपयांचे कर्ज वितरण आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ६६१ कोटी इतका झाला आहे. तसेच राजे बँक ही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज वितरणामध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. बँकेने ग्राहकांचा विविध ठेव व कर्ज योजनांच्या माध्यमातुन विश्वास संपादन केला आहे.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, बँकेचे संचालक सर्वश्री राजेंद्र जाधव, आप्पासो हुच्चे, आप्पासाहेब भोसले, प्रकाश पाटील, रविंद्र घोरपडे, रणजित पाटील,  उमेश सावंत, संचालिका सौ. कल्पना घाटगे,  तज्ञ संचालक अनिल मोरे, बाबासाहेब मगदूम व मुख्य कार्यकारी अधिकारी  विनायक चव्हाण व अधिकारी उपस्थित होते.