केंद्रीय यंत्रणाच्या मदतीने सरकार पाडण्यासाठीच १२५ तासांचे रेकॉर्डिंग : शरद पवार

मुंबई : केंद्र सरकारच्या सगळ्या तपास यंत्रणा या देवेंद्र फडणवीसांच्या विचारांच्या लोकांच्या हातामध्ये आहेत. केंद्रीय तपास संस्थाशिवाय १२५ तासांचे रेकॉर्डिंग होऊ शकत नाही, त्यामुळे भाजप या यंत्रणांचा गैरवापर करुन महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यांनी भाजप नेत्यांना अडकवण्याचा कट केला जात असल्याबाबत स्टिंग ऑपरेशनचा गौप्यस्फोट केला होता. त्याला उत्तर देतांना पवार बोलत होते.

  यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, भाजपचे सरकार गेल्यामुळे ही मंडळी अस्वस्थ आहेत. मात्र, मला त्यांच्या आरोपांचा काही भाग समजला नाही तसेच आरोपांच्या खोलात मी गेलेलो नाहीये. मात्र, सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यात त्यांना यश मिळणार नाही. सरकार पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल.

पवार म्हणाले, १२५ तासांचं रेकॉर्डिंग करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे. एवढे रेकॉर्डिंग करायचं काम केलं असेल तर त्यासाठी मोठया एजन्सीजचा वापर केल्याची शक्यता नाकारता येत नाहीत. अशा एजन्सीज फक्त केंद्र सरकारकडे असल्याने त्यांचा वापर झालेला असू शकतो. हे सिद्ध व्हायला हवं, यासाठी राज्य सरकार नक्कीच तपास करेल. त्यात माझंही नाव घेतलेलं दिसतंय. माझी कुणाशी चर्चा झालेली नाहीये.