खासदार संभाजीराजेंची उद्या जंगी मिरवणूक; हत्तीवरुन साखर वाटणार

कोल्हापूर : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणानंतर खासदार संभाजीराजेंचे प्रथमच उद्या, गुरुवारी करवीरनगरीत आगमन होत आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे असे भव्य दिव्य प्रमाणात स्वागत करुन छत्रपती घराण्याविषयी असणारी कृतज्ञता कोल्हापूरकर व्यक्त करणार आहेत. तर खासदार संभाजीराजें यांची जंगी मिरवणूक काढली जाणार असून हत्तीवरुन साखर वाटण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता. लोकशाहीमध्ये मिळालेल्या घटनात्मक कक्षेत राहून समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा लढा देण्याचा निर्धार त्यांच्या मनात पक्का होता. छत्रपती घराण्याच्या उज्ज्वल परंपरेनुसार या कठीण काळातही युवराज संभाजी महाराज मोठ्या धैर्याने, आत्मविश्वासपूर्ण आणि संयमाने  परिस्थितीला सामोरे गेले. आणि त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले. राज्य सरकारने उपोषणाची दखल घेऊन, समाजाच्या सातही मागण्या तात्काळ सोडवण्याचे लेखी पत्र दिले. हा समाजाच्या दृष्टीने मोठा विजय आहे. यामुळे समाजातील अनेक घटकांना मोठा लाभ मिळणार आहे.

युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषणानंतर प्रथमच उद्या, गुरूवारी सायंकाळी चार वाजता कोल्हापूरात आगमन होणार आहे. त्यांचे जल्लोषी व कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे भव्य दिव्य अशा प्रमाणात स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 स्वागत मिरवणूक मार्ग पुढीलप्रमाणे : सायंकाळी चार वाजता. रुईकर काँलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण, ४:०७ वाजता करवीर संस्थापिका रणरागिणी महाराणी ताराबाईसाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण, सायंकाळी ४:२० वाजता व्हिनस काँर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण, ४:३० वाजता ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. ४:३७ वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन महाराजांना अभिवादन व नर्सरी बागेतील शिवछत्रपती व रणरागिणी ताराबाई साहेबांचे दर्शन. ४:४५ वाजता छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. सायंकाळी ४:५५ वाजता बिंदू चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व  महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. सायंकाळी ५:००वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्य मिरवणूकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणूकीत सर्वात पुढे हत्तीवर स्वराज्याचा जरीपटका असलेला मावळा, त्यानंतर अश्व व त्यावर पारंपारीक वेशातील मावळे व महिला आरूढ होणार आहेत. कोल्हापूरातील वाद्यपथके, मर्दानी खेळ खेळणारे आखाडे, धनगरी ढोल,  वारकरी पथक, लेझीम पथक, तुतारी, झांजपथक सहभागी होणार आहेत. तसेच हत्तीवरुन साखर वाटण्यात येणार आहे.