महिला शिक्षकांनी घातले सरकारचे ‘बारसे’


कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे उपोषण आंदोलनात आज महिला दिनाच्या निमित्ताने महिला शिक्षिकांनी महाविकास आघाडी सरकारचे पाळणा म्हणून ‘बारसे’ घातले.
विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालय समोर या शाळांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी बेमुदत धरणे उपोषण सुरू आहे. आज महिला दिनाचे औचित्य साधून या आंदोलनात जिल्ह्यातील शंभरावर महिला शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. या महिला शिक्षकांनी महाविकास आघाडी सरकारचे पाळणा म्हणत बारसे घातले.
यावेळी यावेळी बोलताना संघटनेच्या नेत्या जयश्री पाटील म्हणाल्या, गेली वीस वर्षे आम्ही महिला शिक्षिका अनुदानाची वाट पाहत अल्प वेतनावर काम करून आमचे कुटुंब चालवत आहोत. शासनाकडे वारंवार विनंती करूनदेखील शासन या शाळांना अनुदान देत नाही. त्यामुळे शिक्षकांची नुकसान होत आहे प्रचलित नियमानुसार अनुदान देणे शासनाला भाग आहे ते मिळालेच पाहिजे.
या आंदोलनात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहा नितीन भुसारी ,भाग्यश्री राणे, जयश्री पाटील ,अश्विनी आळवणी, संजना पाटील आदी शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.