एकतर्फी प्रेमातून साताऱ्यात तरुणीचा खून: तरुणाचाही आत्महत्येचा प्रयत्न

सातारा : सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे एकतर्फी प्रेमातून युवकाने अल्पवयीन तरुणीला चाकूने भोकसले होते. त्या तरुणीचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला. पायल विकास साळुंखे (वय १७, रा. पिंपोडे बुद्रक) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. संशयित आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपोडे बुद्रुक बसस्थानक परिसरातील आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खासगी शिकवणीसाठी पायल चालली होती. यावेळी संशयित आरोपी निखिल राजेंद्र राजे (वय २५, रा. पिंपोडे बुद्रुक) याने तिच्या पोटावर चाकूने वार करून तिथून तो पसार झाला. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, संशयित आरोपी निखिल हा स्वतःहून कोरेगाव पोलिस स्टेशनला हजर झाला. त्याने तणनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे .