राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कमी दाबाचे हे क्षेत्र आणखी तीव्र होऊन तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी पालघर, पुणे आणि नगर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद आणि जळगाव या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळतील. यानंतर मंगळवार आणि बुधवारी राज्यात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा पिकाला फटका बसू शकतो.