निगवेत ट्रकखाली सापडून मेंढपाळ जागीच ठार: दोन मेंढ्यांचाही मृत्यू

कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथे चालकाचा ताबा सुटून साखरेने भरलेला ट्रक उलटल्याने ट्रकखाली सापडून मेंढपाळ जागीच ठार झाला. दगडू शिवाप्पा बाडकर (वय ६०, रा. निगवे दुमाला असे ठार झालेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आज दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास आसुर्ले-पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखान्यातून साखरेची पोती भरून ट्रक निगवे मार्गे शिये फाट्याकडे निघाला होता. ट्रक निगवे येथील आंब्याच्या झाडाखालील स्टॉपजवळ आल्यानंतर ट्रकच्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक उलटला. दरम्यान, यावेळी दगडू बाडकर रस्त्याच्या कडेला मेंढ्याना गवत चरवत होते. ट्रक त्यांच्या अंगावरच कोसळल्याने त्याखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दोन मेंढ्याही ट्रकखाली सापडल्याने ठार झाल्या.