हुबळी – दादर रेल्वे आता नियमित धावणार

बेळगाव : हुबळी ते दादर दरम्यान धावणारी रेल्वे काही कारणास्तव ५ मार्च ते २१ मार्च पर्यंत रद्द करण्यात आली होती. मात्र, हे नियोजन रद्द करण्यात आले असून ५ मार्चपासूनच ही रेल्वे नियमीत धावत आहे.

यासंबंधीचे एक पत्र नैऋत्य रेल्वेने प्रसिद्ध केले आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या रेल्वेचा लाभ घेता येणार आहे.रेल्वे दुपदरीकरण व अन्य कामासाठी हुबळी ते दादर दरम्यान ५ मार्च ते २० मार्च पर्यंत तसेच दादर ते हुबळी दरम्यान ६ मार्च ते २१ मार्च पर्यंत ही रेल्वे रद्द करण्यात आली होती.मात्र नेहमीप्रमाणेच ही रेल्वे धावणार आहे. हुबळी हुन रोज दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी ही रेल्वे दादरसाठी निघते. सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी बेळगावला पोहोचते.

तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता मुंबईला पोहोचते. तसेच दादरहून रात्री ८ वाजून पंचवीस मिनिटांनी निघते. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून पंचवीस मिनिटांनी हुबळीला पोहोचते. यामुळे या रेल्वेला नेहमी प्रवाशांची गर्दी असते. पंधरा दिवस रेल्वे बंद होणार होती. त्यामुळे प्रवाशांची नाराजी दिसून येत होती. मात्र, आता ही रेल्वे नेहमीप्रमाणे धावणार असल्याने प्रवासातून समाधान व्यक्त होत आहे.