लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया- युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. त्याचा फटका भारतालाही बसणार असून देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात प्रतिलिटर १२ ते २५ रुपयांची वाढ होऊन ते १३५ रुपये प्रति लिटर होण्याची शक्यता आहे. सध्या चार राज्यांत सुरू असलेल्या निवडणुकांनंतर दरवाढीचा भडका उडणार आहे.

रशिया युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १११ ते ११७ डॉलरपर्यंत गेले आहेत. हे दर २०१३ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहेत. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून येत्या काही दिवसांत पेट्रोल व डिझेलचे दर लिटरमागे १२ ते २५ रुपयांनी वाढविले जातील, अशी शक्यता आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे दर स्थिर होते. मात्र, दरवाढीसाठी निवडणुकीनंतर मुहूर्त साधला जाणार आहे.

रशिया देश कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा उत्पादक असून रशिया ५० लाख ते ६० लाख बॅरल कच्चे तेल निर्यात करतो. भारत कच्चे तेल रशियातून फारसे मागवत नाही; पण याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरावर झाला आहे. त्याचा फटका भारताला बसणार आहे. भारतातील कच्च्या तेलाची ८५ टक्के गरज ही आयातीवरच अवलंबून आहे.

जागतिक बाजारात कचरा तेलाचे दर तीन महिन्यांतच ७० डॉलर्सवरुन ११७ डॉलर्स पर्यंत गेले आहेत. इंधन दरवाढीपासून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्राने टॅक्स कमी केला होता. त्यापाठोपाठ अनेक राज्य सरकारांनीदेखील आपले कर कमी करत नागरिकांना दिलासा दिला होता. आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्याची झळ सर्व सामान्य माणसाला बसणार आहे.