लक्षणीय मांडणी, उत्तम सादरीकरण : कातळडोह

अश्‍विनी टेंबे : कोल्हापूर: सोकाजीराव टांगमारे, पाहिजे जातीचे, मीटर डाउन, शांतता कोर्ट चालू आहे… अशा हलक्याफुलक्या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण करणार्‍या फिनिक्स संस्थेने धनंजय सरदेशपांडे लिखित आणि डॉ. राजश्री खटावकर दिग्दर्शित ‘कातळडोह‘ सारखे अत्यंत गंभीर आणि क्लिष्ट नाट्याचा प्रयोग राज्य नाट्य स्पर्धेत केला.

नेपथ्याची अत्यंत लक्षणीय मांडणी आणि सर्वच कलाकारांनी केलेलं उत्तम सादरीकरण दिग्दर्शकीय दृष्टीकोनाचे सारे तपशील नेमकेपणानं सांगणारं होतं. युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर घडणारं हे चर्चा नाट्य असून पृथ्वीवर सध्या सुरु असलेल्या अराजकाचं एक प्रतिक मानावं लागेल. नाटकामध्ये काही सैनिकांनी सरकारी धोरणांविरुद्ध बंड पुकारले आहे. त्याचा वणवा जगभर पसरला आहे. आणि या वणव्यातून वाचण्यासाठी सैनिक, तरुण, नेता, धर्मगुरु आणि एक स्त्री एका भकास झालेल्या तळघराचा आसरा घेतात. भिती आणि मृत्युच्या छायेखाली असतानाही माणसाची मूळची प्रवृत्ती कशी बदलत नाही. हे या नाटकातून दिसते. यात अशीही एक व्यक्तिरेखा आहे जी भूतकाळातील घटनांचे अप्रत्यक्षरित्या दाखलें देत या सगळ्यांना सावध करण्याचा प्रयत्न करते. नाटकात जी स्त्री व्यक्तीरेखा आहे ती पृथ्वीचं प्रतिक आहे. जी राजकारण, धार्मिकता, समाजव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था यामधील गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण गुंता काही सुटत नाही. हा एक कडक अशा कातळाचा तळ न लागणारा डोह आहे. न सोडवता येणारा असा गुंता होवू नये यासाठी आताच आंतर्मुख होवून विचार करा… असा सुचक संदेश देवुन हे नाटक संपते.

क्लिष्ट आणि गंभीर विषय नेमकेपणाने पोचवण्यासाठी ज्या दिग्दर्शकीय कसोटीची गरज होती, ती नक्कीच सार्थ झाली. जळालेले बॉक्स, मोडक्या खुर्च्या, जुनी सायकल, पोती, टायर, हौद अगदी जळमटेही तळघराच्या नेपथ्य रचनेतून सुटली नाहीत. इतकं नेपथ्य वास्तववादी होतं. प्रतिकात्मक व्यक्तिरेखांसाठी प्रतिकात्मक नेपथ्य चाललं असतं. पण पृथ्वीचा टप्प्याटप्पयावर होणारा र्‍हास पाहता या तपशिलवार नेपथ्याची सुचकता समजून येते.

दिग्दर्शिकाने नाटकाच्या आशयाबाबत केलेला संवेदनशील विचार पात्रांच्या अभिनयातून दिसत होता. सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकां पुरेपूर निभावण्याचा मनापासून केलेला प्रयत्न आणि मेहनत दिसून येत होती. स्त्री ची व्यक्तीरेखा अधिक उल्लेखनीय. तिचे गूढ बोलणे भूतकाळातील घटनांचे दाखले देत होते. जखमी सैनिकाची हतबलता नेमकेपणाने साकारली. बाकी धर्मगुरु, नेता, तरुण यांचा वावर अगदीच सहज वाटला.

पार्श्‍वसंगीत आणि प्रकाशयोजनांचा नेमका पण चपखल वापर नाटकातील भयाणता मांडणारा होता. आशय क्लिष्ट असल्याने येणारा रटाळपणा फारसा टाळता आला नाही. एका गंभीर पण सध्याच्या वातावरणाशी सुसंगत नाट्यप्रयोग करण्याचा फिनिक्स चा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला.