विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे भवितव्य अंधकारमय

मुंबई : सरकारबरोबरील पत्रप्रपंच, विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, विधेयके फेरविचारार्थ परत पाठविणे यापाठोपाठ अभिभाषण अर्धवट करणे यातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायमच महाविकास आघाडी सरकारशी संघर्षांची भूमिका घेतली आहे.

या साऱ्याचा परिपाक म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे भवितव्य आता अंधकारमय झाले आहे.सरकारी विमानातून खाली उतरविण्यात आल्याने राज्यपाल कोश्यारी यांचा जळफाट झाला होता. अभिभाषण अर्धवट सोडून त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर कुरघोडी केली. विधानसभा अध्यक्षपदाची ९ मार्चला निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची योजना आहे.

विधानसभा नियमातील ६ (१) कलमानुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख हे राज्यपाल निश्चित करतात. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी राज्यपालांनी नियमात करण्यात आलेले बदल बेकायदेशीर असल्याचे मत व्यक्त करीत निवडणुकीला मान्यता दिली नव्हती.

सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या घोषणाबाजीमुळे राज्यपाल संतप्त झाले आहेत. यातूनच अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राज्यपालांकडून पुन्हा एकदा कोलदांडा घातला जाईल, अशी शक्यता सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते.