बारावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून ‘परीक्षा’

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.
परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी केली आहे. कोरोना काळात लिखानाचा सराव कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरला जादा अर्धा तास वेळ देण्यात येणार आहे. तर विद्यार्थी तणावमुक्त राहावेत म्हणून ते शिक्षण घेत असलेल्या शाळा, महाविद्यालयातील त्यांची परीक्षा होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ५२ हजार २१४ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील एकूण २९१ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लेखी परीक्षा घेण्यात आली नव्हती. परंतु यावर्षी कोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बारावीच्या लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बारावीची परीक्षा ७ एप्रिलपर्यंत चालणार असून ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच पेपर फुटीला आळा घालण्यासाठी वर्गातच प्रश्नपत्रिकांचे पाकीट फोडण्याचा नवा नियम मंडळाने केला आहे. परीक्षेच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे.