पोलिसांतील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोड्यामुळे खाकी वर्दीवर बदनामीचे ‘डाग’

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास डॉ. अभिनव देशमुख आणि विद्यमान पोलीस अधीक्षक शैलैश बलकवडे यांनी कठोर निर्णय घेऊन शिस्त लावली आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांची मान राज्यभर उंचावली आहे. मात्र शहरातील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांतील अंतर्गत कलह, गटबाजी आणि कुरघोड्यामुळे खाकी वर्दीवर विनाकारण बदनामीचा ‘डाग’ लागत आहे.

कोल्हापूर पोलीस दलाचा राज्यभर नावलौकिक आहे. येथे अनेक अधिकार्यांनी चांगले काम केले आहे. येथील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या तपासासाठी पोलीस महासंचालक पदक, राष्ट्रपती पथकाने सन्मान झाला आहे. जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांनी ‘आयएससो २०००’ मानांकन मिळवले आहे. गेल्या चार वर्षांपासून तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अनेक चांगले निर्णय घेत पोलीस दलात शिस्त निर्माण केली.

अनेक मोठ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. गुन्हेगारावर जरब निर्माण केली. त्यानंतर डॉ. शैलैश बलकवडे यांनीही गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका लावत अनेक नामचीन गुंडांना हद्दपार केले तर अनेक टोळ्यांना मोक्का लावला. अवैध धंद्यावर अंकुश निर्माण केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पोलिसांबद्दल आदराने बोलत आहेत. पण या चांगल्या कामावर डाग लावण्याचे काम पोलीस दलातीलच काही झारीतील शुक्राचार्य करत आहेत.

शहरात अवैध धंदे बंद असताना पोलीस ठाण्यातील अंतर्गत वाद, गटबाजी यातून काही कर्मचारी चुकीच्या बातम्या पेरत आहेत. यासाठी पोलीस ठाण्यातील हद्दवादाचे आणि कुरघोडीचे राजकारणही कारणीभूत आहे. शहरात चांगले वातावरण आणि अवैध धंद्यावर आणि गुन्हेगारावर नियंत्रण असताना ही काही असंतुष्ट मंडळी चुकीची माहिती बाहेर पोहोचवत आहेत. त्यामुळे पोलिस दलाची नाहक बदनामी होत असून काहींच्या स्वार्थासाठी चांगल्या कामावर पाणी फिरवले जाते. यातून सोशल मिडिया वर विनाकारण वावड्या उठल्या जात आहेत.

यामुळे वरिष्ठांनी केलेल्या चांगल्या कामांना व प्रयत्नांना खो बसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनीही हे तांदळाचे खडे बाजूला करण्याची गरज असून पोलिस दलातील वाचाळवीर आणि चुकीच्या गोष्टींच्या बातम्या पेरणार्ऱ्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.