मुरगूड : आदमापूरच्या सद्गुरू बाळूमामा तिर्थक्षेत्राला दिवसेंदिवस भक्त भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून या भाविक भक्तांची गैरसोय होत आहे.पायी दिंड्या येत आहेत.मरगुबाई मंदिर परिसर गजबजून जात आहे. ग्रामपंचायत स्तरावर निधीची मर्यादाअसल्याने सोयीसुविधांची वानवा आहे. यासाठी बाळूमामा देवस्थानकडे जमा होणाऱ्या निधीपैकी १० टक्के रक्कम या विकासावर खर्च केल्यास भाविकांची चांगली सो़य करता येणे शक्य आहे.असे मत सरपंच विजय गुरव यांनी व्यक्त केले.
यावेळी गुरव म्हणाले की, बाळूमामा देवालयाकडे आदमापुर गावातील सोयी-सुविधांसाठी साठी जी निधीची मागणी करत आहोत त्याला स्पष्ट शब्दात देवस्थान मंडळ नकार दिला आहे.दुसरीकडे मात्र याच देवालयाचे हे पदाधिकारी आवश्यकता नसताना मोठमोठी कंत्राटे काढून वारेमाप पैसा उधळत आहेत.ज्या आदमापूरच्या भुमिवर हे सारे तीर्थक्षेत्र उभे आहे त्या आदमापूरच्या भुमीसाठी मग निधी का देता येत नाही?यामागचे गौडबंगाल काय ? जाणत्या लोकांनी या गोष्टीचा विचार करावा.
आदमापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आंम्ही या निधीच्या मागणी सत्राचे अभियान सुरु ठेवले आहे.बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची गैरसोय टाळावी हा एवढाच हेतू मी सरपंच या नात्याने व्यक्त करत आहे.शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर हा निधी आदमापूर ग्रामपंचायतीला मिळावा जेणेकरून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बाहेरगावाहून शेकडो मैलांचा प्रवास करून आलेल्या भक्तांची चांगली सोय होईल. आदमापूर हे गांव धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून देशाच्या नकाशावर आणण्याचा आमचा विचार आहे. जोपर्यंत आदमापूर ग्रामपंचायतीला देवस्थानकडून निधी मिळत नाही, तो पर्यंत निधी मागणी अभियान लढा सुरू ठेवणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.