ईडीचे अधिकारी पहाटे ५ वाजता नवाब मलिकांच्या घरी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. पहाटे पाच वाजताच ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घऱी पोहोचले होते. यानंतर त्यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आलं असून चौकशी सुरु आहे.

एका जमिनीच्या व्यवहारासंबंधी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे अशी टीका केली आहे. ते म्हणाले की, “हा सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी प्रकार आहे, कोणतीही, सूचना ने देता पहाटे सहा वाजता येऊन ईडी स्वतःच पोलीस आणत राज्यातील मंत्र्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली आहे”.

अलीकडे नवाब मलिक यांनी काही प्रकरणं बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून त्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचं काम करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहे. नेमकं कोणते प्रकरण आहे याबद्दल माहिती नाही, गेल्या काही वर्षात असं प्रकरणही दिसत नाही. नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.