राशिवडे : छत्रपती शिवाजीराजे हे लोकोत्तर राजे असून त्यांनी प्रजेसाठी केलेल्या कार्याची संपुर्ण जगाने गौरव केला आहे.असा लोकराजा भुतलावर पुन्हा होणार नाही. त्यामुळे शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक राजे आहेत. असे प्रतिपादन भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी केले.
शाहूनगर परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी आ.पाटील हे बोलत होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारखा न्याय नितीने प्रजेसाठी झटणारा राजा जगाच्या इतिहासात नाही.म्हणूनच कुठेही मंदिर नसताना आज चारशे वर्षानंतरही जयंती साजरी होते,असे आ.पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी येथे शिव पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली भोगावती साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आल्यानंतर आमदार पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांची शिवाजी महाराजांची भुमिका आणी कु.विर विश्वजित पाटील-सडोलीकर या चिमुकल्याने साकारलेली बालशिवाजीची भुमिका मिरवणुकीत लक्षवेधी ठरली.
कुरुकली ते भोगावती कारखानापर्यत शोभायात्रा पालखीसोहळा, शिवज्योत आणी पारंपारिक वेशभुषेतील मावळे यामुळे संपुर्ण परिसरच शिवमय,भगवामय झाला होता. छत्रपती शाहु पुतळ्याजवळ या शोभायात्रेची सांगता झाली. यावेळी आमदार शंकर धोंडी पाटील हायस्कुल कंथेवाडीच्या मुलींसह विशाल ढेरे ग्रुपने पोवाड्याचे सादरीकरण केले. उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जि.प.चे अध्यक्ष राहुल पाटील,स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डाँ.जालंदर पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष किशाबापु किरुळकर,बी.के.डोंगळे,संजय गांधी निराधार करवीरचे अध्यक्ष संदीप पाटील,सुशिल पाटील,रविश पाटील आदी उपस्थित होते.स्वागत-प्रास्ताविक संचालक प्रा.सुनिल खराडे यांनी केले तर आभार भोगावती शिक्षणचे अध्यक्ष जयसिंग हुजरे यांनी मानले.