शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण वर इतमामात अंत्य संस्कार

सांगली : भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले जवान रोमित तानाजी चव्हाण यांच्यावर शिगाव तालुका वाळवा या त्यांच्या गावी वारणा नदीकाठी शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले.

यावेळी आबालवृद्धांना अश्रू अनावर झाले. रोमितच्या मित्रांनी एकच टाहो फोडला. आपल्या जवान मित्राला साश्रु नयनांनी आखरेचा निरोप दिला. तत्पूर्वी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान रोमितचे पार्थिव शिगाव येथे त्याच्या घरी दाखल होताच गावच्या सुपत्राचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. आई, वडील, बहीण, नातेवाईक, मित्र, गावकरी यांनी रोमितचे पार्थिव पाहताच एकच टाहो फोडला.काश्मीरमधील सोफिया भागात एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करताना शनिवारी सकाळी रोमित चव्हाण यांच्यासह आणखी एक जवान शहीद झाला होता.

रोहित चव्हाण यांना गोळी लागल्याचे समजताच सांगली जिल्ह्यातील शिगाव गावावर शोककळा पसरली होती. रोमित हा तानाजी चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासूनच सैन्यदलाचे आकर्षण असल्यामुळे वयाच्या १९ व्या वर्षीच तो सैन्यदलात भरती झाला होता. गेल्या वर्षभरापासून तो काश्मीरमध्ये सेवा बजावत होता. दोन महिन्यांपूर्वीच सुट्टीहून परत गेल्यानंतर त्याचे काश्मीरमधील सोफियाँ भागात पोस्टिंग झाले होते. तीन मार्चला त्याचा वाढदिवस असल्याने तो पुन्हा सुट्टीवर येणार होता. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रोमित चव्हाण यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले.