पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना भविष्याची चिंता

सातारा ::तापमान वाढ ही जागतिक समस्या निर्माण झाली असून यामुळे अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, ढगफुटी इत्यादी घटना वारंवार पाहायला मिळत आहेत. तापमान वाढीवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होतील, अशी चिंता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

वाहतुकीची साधने कमी प्रमाणात वापरणे किंबहुना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, इलेक्ट्रिकल वाहने वापरणे, सोलर एनर्जी, गोबर गॅसचा वापर, जल व वायू प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी सातारा येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.

सातारा जिल्हा बँक व दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित ग्लोबल वॉर्मिंग -ग्लोबल वॉर्निंग परिसंवादाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते. या कार्यक्रमात सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, पर्यावरण तज्ञ खा. वंदनाताई चव्हाण, बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, शेखर गोरे, दत्तानाना ढमाळ, सत्यजित पाटणकर, सुरेश सावंत,प्रदीप विधाते आदी उपस्थित होते.