चांगभलंच्या गजरात जोतिबाचा पहिला खेटा उत्साहात संपन्न

कोल्हापूर : जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या अखंड गजरात दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या खेटयांना सुरुवात झाली असून पहिला खेटा रविवारी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे खेट्याची परंपरा खंडित झाली होती. रविवारी भाविकांनी प्रचंड गर्दी करत आपल्या लाडक्या जोतिबाचे दर्शन घेतले.रविवारी पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. श्रींची पाद्यपूजा व काकड आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. सकाळी आठ वाजता श्रींना अभिषेक करून खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली. दुपारी धुपारती सोहळा झाला.दिवसभरात पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी मंदिरातील व्यवस्थेची पाहणी केली. सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा झाला.