शिवसेनेचा भगवा कोल्हापूर महानगरपालिकेवर फडकवून, शिवसेनेचा महापौर करू

कोल्हापूर: कोल्हापूर शहर व जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेने आपली ताकत वेळोवेळी दाखवून दिली आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक त्रीसदस्यीय पद्धतीने होत असून, शिवसेनेला याचा लाभच होणार आहे.

कोल्हापूर शहरासाठी गेल्या काही महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला असून, कोल्हापूर शहराचा विकास करण्याकरिता शिवसेना कटिबद्ध आहे. शिवसेना आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असून, शिवसेनेचा भगवा कोल्हापूर महानगरपालिकेवर फडकवून, शिवसेनेचा महापौर करून दाखवू, असा विश्वास शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केला.शिवसेना आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यावेळी बोलताना शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची आज बैठक पार पडली.

शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास शिवसैनिक तयार आहेत. ही निवडणूक स्वबळावर लढावी आणि जिंकून शिवसेनेचा महापौर करावा, यासाठी सर्वजण आग्रही आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून, शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकून, शिवसेनेचा महापौर करून दाखवू. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिकांचा २७ फेब्रुवारीच्या दरम्यान मेळावा आयोजित केला जाणार आहे.